खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव
श्रीक्षेत्र जेजुरी क-हा नदीच्या पठारावरील कुलस्वामी खंडेरायाची राजधानी, या क्षेत्राच्या अवतीभोवती अनेक तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटन स्थळे आहेत, त्यांना भेट दिल्याशिवाय जेजुरी यात्रा संपूर्ण कशी होणार ? म्हणून श्रीक्षेत्र जेजुरी पंचक्रोशीतील महत्वपूर्ण स्थळांची थोडक्यात परंतु परिपूर्ण माहिती...
कुलधर्म कुलाचार
प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान वाटत असतो, पण कुळ म्हणजे काय ? कुलधर्म कुलाचार म्हणजे काय ? त्याचे पालन कसे करायचे ? कुलस्वामी खंडोबाचे कुलाचारातील विधी कसे पार पाडायचे वगैरे संपर्ण माहिती
nice temple and ,well maintained
Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!
its nice....!!!
Very good temple and there facilities
Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted
Comments for this guestbook have been disabled.
मोरगावचा मयुरेश्वर
अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगाव मयुरेश्वर म्हणजे गाणपत्य पंथीयांचे आद्यक्षेत्र. जेजुरी पासून बारामती रस्त्यावर सतरा किलोमीटर अंतरावर मोरगाव आहे.क-हा नदीच्या तीरावर वसलेल्या गणेश क्षेत्राविषयी एक आख्यायिका सांगितली जाते, सिंदुरासूर दैत्याचा संहार गणेशाने मयूर ( मोर ) वाहन घेऊन केल्याने या गणपतीला मयुरेश्वर असे संबोधतात तर क्षेत्राला मोरगाव असे नाव पडले. सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराची उभारणी सोळाव्या शतकात केली असल्याचे सांगण्यात येते. मंदिराला चारही बाजूने तटबंदी असून पूर्वेकडील महाद्वारा समोर मोठा नंदी आहे गणेश मंदिरासमोर नंदी फक्त येथेच पहावयास मिळतो. मंदिरातील गणेश मूर्ती बैठ्या स्वरुपात सिंदूर चर्चित आहे.मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर अनेक रूपातील गणेश मूर्ती आहेत. भाद्रपद व माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये द्वारयात्रा भरते त्यावेळी खूप मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. चिंचवडच्या मोरया गोसावींनी या गणपतीची अखंड सेवा केली म्हणून आजही मोरया गोसावींची पालखी वर्षातून दोनदा द्वार यात्रेच्या वेळी चिंचवडहून मोरगावला येते.तसेच प्रत्येक महिन्याच्या विनायकी व संकष्टी चतुर्थीला येथे मोठी गर्दी होते.द्वारयात्रा काळामध्ये सकाळच्या पहिल्या प्रहरापासून मध्यान्ही पर्यंत श्रीना जलाभिषेक असतात. दररोज मंदिर पहाटे पाच वाजलेपासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असते.मोरगाव पासून उत्तरेकडे सुपे मार्गावर नग्न भैरव मंदिर आहे.शासनाने अलीकडे हा परिसर मयुरेश्वर अभयारण्य म्हणून संरक्षित केला आहे.या अभयारण्यात चिंकारा जातीच्या हरणांची व मोरांची खूप मोठी संख्या आहे. मोरगाव तीर्थक्षेत्रा विषयी अधिक माहितीसाठी संपर्क - देवस्थानचे पुजारी श्रीयुत यज्ञेश्वर (गजानन) बाळकृष्ण धारक. मोबा.९८८१४१२९८८ / ९९७०९२९१८९
पांडेश्वर
जेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे,महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात' अशी लोकधारणा आहे .या मंदिराला गौरवशाली वारसा आहे या मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर ,दगडी मुखमंडप ,नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या ,मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात. भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे.४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते.मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर,उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे .विटांच्या या प्राचीन वस्तूला चौथ्या शतकात आकार मिळाला असावा तर पुढील जोडकाम सतराव्या किंवा अठराव्या शतकात झाले असावे.दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत.सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने,प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक ,भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.
भुलेश्वर
जेजुरी पासून साधारण पंचवीस किलो मीटर वर उंच टेकडी वर
भुलेश्वर देवस्थान आहे.शिल्प सौंदर्याने ओतप्रोत भरलेले तसेच इतिहास व
कलागुणांचा संगम असलेले भुलेश्वर मंदिर सध्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात
आहे व लाल फितीच्या कारभारात अडकल्याने पर्यटकांपासून अंधारात राहिले
आहे.इसवी सन १२५० च्या सुमारास या मंदिराचे दगडी बांधकाम झाले व मराठे
शाहीतील पेशव्यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यामध्ये कळसाचे
बांधकाम झाले.या टेकडीला किल्ले दौलत मंगळगड म्हणतात बुरुज व तटबंदी
ढासळलेल्या अवस्थेत असून आजही इतिहास आणि किल्ल्याची साक्ष देत उभे आहेत.
भुलेश्वर मंदिराकडे जाताना प्रथम तीन ते चार वळणांचा अवघड घाट व नंतर
थोड्या पाय-या चढाव्या लागतात.पुढे मोठी घंटा पाहून पेशव्यांनी विस्तारित
केलेल्या बांधकामातून पुढे उजव्या व डाव्या बाजूला दहा-बारा पाय-यांचा
अंधारी मार्ग चढला कि वेगळ्याच विश्वात गेल्याचा भास होतो.प्रसन्न व धार्मिक
वातावरण मन भरून टाकते. भव्य काळ्या पाषाणातील कोरीव नंदी असलेला मंडप
सोडून पुढे निघाले कि शिल्प सौंदर्याची अनुभूती येण्यास सुरुवात होते. मुख्य
गर्भगृहात मध्यभागी सुंदर शिवलिंग आहे.याची शाळुंका वेगळी असून,
पूजेच्या वेळी ती बाजूला काढली जाते.तेथे असलेल्या पोकळीत ब्रम्ह विष्णू व
महेश अशी तीन लिंगे आहेत.आतमध्ये पेढा अथवा प्रसाद ठेवला असता नाहीसा होतो
असा भाविकांचा अनुभव आहे.
मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर वाद्य वाजविणा-या मूर्ती, नृत्यांगना,
दर्पणधारी ललना तसेच देवतांच्या मूर्ती, रामायण महाभारतातील कथात्मक
शिल्पांकन असे मौल्यवान शिल्प सौंदर्य आढळते.हत्ती, घोडे, सिंह, माकडे,
उंटांच्या प्रतिमा सारेच अप्रतिम.
मंदिरातील मातृकापटात गणेशी व वैनायीकीच्या मूर्ती
आढळतात.द्रौपदी स्वयंवर , अर्जुनाद्वारे मत्स्यभेद असे प्रसंग
मुर्तीकालेच्या माध्यमातून साकारले आहेत. सूरसुंदरींची अनेक शिल्पे मंदिरात
आढळतात या मूर्तींचा रेखीवपणा, प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव या सर्वांचे
आश्चर्य वाटावे अशा पद्धतीने काळ्या पाषाणामध्ये घडविण-या कलाकारांना सलाम
करावासा वाटतो.परंतु याच सौंदर्याला दृष्ट लागली आणि विध्वंसक वृत्तींनी
या शिल्पकलेची केलेली मोडतोड पाहून मनामध्ये सतत सल बोचत राहते.
क-हेपठारावरील भुलेश्वराचे अप्रतिम शिल्प सौंदर्य पाहिल्यानंतर पर्यटकांना अनोखी अनुभूती मिळते.
मल्हारगड
किल्ले मल्हारगड / किल्ले सोनोरी / किल्ले तरुणगड
महाराष्ट्रामध्ये असणा-या गिरीदुर्गांचा इतिहास पाहता, 'मल्हारगड' हा निर्माण झालेला अखेरचा गिरीदुर्ग. या किल्ल्याची निर्मिती इ.स.१७५७ ते इ.स.१७६०
च्या
दरम्यान झाली, म्हणजे या गिरीदुर्गाचे वयोमान उणेपुरे अवघे अडीचशे वर्ष.
अन्य दुर्गांच्या पंक्तीमध्ये वयोमानानुसार याचे अखेरचे स्थान म्हणून याला
अभ्यासक तरुणगड असेही म्हणतात. पायथ्याला असणार्या
सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. मराठेशाहीतील उत्तरार्धात
पेशव्यांनी पुण्यातून कारभार सुरु केल्यानंतर, सरदार पानसेंना तोफखान्याचे
प्रमुख म्हणून स्वतःच्या कर्तबगारीवर सरदारकी मिळाली. सरदार पानसेंनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी
पुणे आणि किल्ले पुरंदर यांच्या मध्ये पुण्याजवळ किल्ला उभारण्याचे योजले. त्यासाठी त्यांनी क-हेपठरावरील सोनोरी
गावाजव ळ डोंगराची निवड केली. दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. पानसेंनी आपल्या उत्कर्षाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती केली परंतु ते
आपल्या घराण्याच्या कुलस्वामी खंडेरायाला मात्र वि सरले नाहीत किल्ल्याला
त्यांनी मल्हारगड असे नाव देवून आपल्या कुलस्वामी प्रती श्रद्धा व्यक्त
केलेली आढळून येते. किल्ल्याला मल्हारगड नाव देण्यामागे ही एक दंतकथा सांगितली जाते ती पुढे दिलीच आहे, अशा दंतकथांना ऐतिहासक दस्तऐवज म्हणून पाहता येत नसले तरी त्यावेळचे समाजमन समजण्यासाठी यांचा उपयोग होतो.
मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून
आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. गडाची उंची समुदसपाटीपासून ३१६६ फूट आहे, इतर
किल्ल्यांच्या तुलनेमध्ये
मल्हारगड आकाराने लहान आहे, साधारणपणे साडेचार ते पाच एकर क्षेत्रावर, या
किल्ल्याचा विस्तार आहे. तटबंदीची काही ठिकाणी पडझड झाली असली तरी ब-यापैकी
शाबूत आहे.
गड किल्ल्यांच्या उभारणीविषयी किंवा नावाविषयी अनेक दंतकथा, भयकथा आणि रंजककथा अबालवृद्धांमध्ये प्रिय असतात, अशाच प्रकारची एक दंतकथा सोनोरी गावातील वयस्कर व्यक्तींकडून ऐकायला मिळाली. अशा दंतकथा आचंबित करणा-या असतात, तर किल्ल्याला मल्हारगड नाव देण्यामागे एक आचंबित करणारी दंतकथा सांगितली जाते,'किल्ल्याच्या उभारणीचे बांधकाम चालू असताना तटबंदी अनेक वेळा ढासळत होती म्हणून खडक सुरुंग लावून फोडण्याचे ठरले, मजूर सुरुंगासाठी खाणत्या घेत असताना एके ठिकाणी रक्ताचा पाझर फुटला, हा अजब प्राकार पाहून मजूर काम सोडून पळून गेले, सरदार पानासेंच्या कानावर ही वार्ता गेली. अनेक प्रयत्न करून सुद्धा रक्ताचा पाझर काही केल्या थांबेना तेव्हा सरदार पानासेंनी जेजुरीच्या कुलस्वामी खंडेरायास नवस केला हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, तुझ्या नावाचा महिमा गायिन आणि आजन्म तुझी सेवा करीन' अशा रीतीने नवस बोलून जेजुरीहून आणलेला भंडार त्याठिकाणी वाहिल्यानंतर तो रक्ताचा पाझर थांबला, आणि गडाचे बांधका म सुरळीतपणे पार पडले. सरदार पानासेंनी बोलल्याप्रमाणे गडाला "मल्हार" असे नाव दिले तर गडावर छोटे खानी मल्हारी मार्तंडाचे मंदिर बांधले.
जेजुरी पासून बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेला मल्हारगड सासवडच्या उत्तरेकडे आहे. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो, गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गडावर फारसे लोक किंवा पर्यटक येत नाहीत. जे जातिवंत भटके आहेत त्यांचाच केवळ राबता या गडावर असतो. त्यामुळे गडाचा परिसर मात्र अगदी स्वच्छ आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या नाहीत आणि इतस्ततः फेकून दिलेले कागद आणि प्लॅस्टिकचा केर-कचराही नाही. गडावर गेल्यावर मन अगदी प्रसन्न होते. पाण्याची आणि जेवणाची सोय स्वतःच करावी लागते. गडावर पाणीही नाही आणि खायला काहीही मिळत नाही. डोंगराच्या सोंडेवरुनही गडावर प्रवेश करता येत असला तरी उजवीकडील बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते. याठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या डोंगराला पडलेला बोगदा दिसतो त्याला सुईचे भोक (needle hole) असेही म्हणतात. पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड् याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.
पुढे किल्ल्याच्या टोकावर असणा-या पश्चिम बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहीरीतही पाणी नाही. या बुरूजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातुन किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ श्रीखंडोबाचे आणि दुसरे त्यापेक्षा थोडेसे मोठे देऊळ महादेवाचे आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे.
सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहा सिक कागदपत्रांमध्ये आढळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सहका-यांनी गनिमी काव्याने लढण्यासाठी व इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी याच गडाचा आश्रय घेतला. बरेच दिवस ते किल्ल्याच्या आधाराने बचाव करू शकले होते. परंतु फितुरीचा शाप भोवला आणि इंग्रजांना कुणकुण लागलीच व गडावर साहेबी सैन्य थडकलं सुदैवाने क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके निसटून जाण्यात यशस्वी झाले.
या गडाचे जनक, सरदार पानसे यांच्या वाड्याचे अवशेष सोनोरी गावात पहायला मिळतात. अंबारीसह हत्ती जाऊ शकेल अशा प्रवेशद्वाराची भव्यदिव्य कमान, तटबंदीचे बुरुज, मराठा साम्राज्याच्या वैभवाची आणि सुबत्तेची साक्ष देत आजही उभे आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस उत्तरेकडे तटबंदीला लागूनच सरदार भिवराव पानसे यांची समाधी आहे त्याच्या बाजूलाच पाण्याची मोठी पाय-यांची विहीर आहे. तटबंदीचे बुरुज, हत्ती बांधायची साखळी, वाड्यातील लक्ष्मी नारायणाचे मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर प्रेक्षणीय आहे. पानसे यांचे वंशज आज तिथे राहत नाहीत, सारे जण नोकरी धंद्या निमित्त बाहेर असतात परंतु कृष्ण जन्माष्टमीचेवेळी बहुतांश इथे जमा होतात.
सरदार पानसे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची, जेजुरीच्या मल्हारी मार्तंडावर अपार श्रद्धा होती. त्यापैकीच महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानसे या बंधूद्वयांनी मल्हारी मार्तंडाच्या चरणी एक मण वजनाचा खंडा आणि ढाल वाहिलेली आहे ते आपणांस जेजुरगड मंदिरामध्ये पहावयास मिळते.
सासवड
जेजुरी पासून सतरा किलोमीटर अंतरावर
वायव्य दिशेकडे क-हा व चर्णावती अर्थात चांबळी नद्यांच्या संगमावर सासवड
वसलेले आहे. क-हेपठरावरील पुरातन तसेच ऐतिहासिक काळापासून महत्वाचे ठाणे असलेले सासवड सध्यस्थितीमध्ये पुरंदर तालुक्याचे गाव म्हणून ओळखले जाते. ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीला
पुराणकथांमध्ये ब्रम्हपुरी असे म्हणत, तर सोपानदेव समाधी प्रसंगाचे
वर्णनामध्ये नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात
" भक्त समागमे हरी | सत्वर आले संवत्सरी || "
याचाच अर्थ सासवडचा उल्लेख संवत्सर क्षेत्र असा आल्याचे आढळते.या व्यतिरिक्त सहा वाड्यांचे (वस्ती) गाव म्हणून सासवड तर आणखी एका आख्यायिकेनुसार या ठिकाणी सात मोठी वडाची झाडे होती त्यावरून सातवड हे नाव पडले व पुढे त्याचे सासवड झाले असे सांगितले जाते.
संत सोपानदेव महाराज समाधी मंदिर
विठोजि म्हणे देई चित्त । ऐक गुह्यार्थ सांगतो ॥ १ ॥
ही पुण्यभूमी पवित्र देखा । याची मूळ आदि पीठिका ।
सिद्धेश्वर नागेंद्र देखा । पुरातन नांदती ॥ २ ॥
या इंद्रनील पर्वतीं । तप तपिन्नले अमरपती ।
आणि सूर्यमूखा वरुती । प्रत्यक्ष मूर्ति श्रीशंकराची ॥ ३ ॥
ही स्मशानभूमिका आधीं । येथें सोपान देवा समाधी ।
पुढें राहिला कैलासनिधी । सन्मुख वाहे भागीरथी ॥ ४ ॥
इची करितां पंचक्रोशी । चुके जन्ममरण चौर्यांशी ।
चारी मुक्ती होती दासी । येउनि चरणासी लागती ॥ ५ ॥
तो हा सोपान निधान । याचे करितां नामस्मरण ।
सेना कर जोडून । जाती जळून महादोष ॥ ६ ॥
सासवडच्या पश्चिम दिशेस भोगवती (चांबळी) च्या पावनतीरी हे पुण्य पवित्र सोपानदेव मंदिर उभे आहे. हे मंदिर म्हणजे अध्यात्मज्ञानाचे महन्मगंल केन्द्रच. मंदिरात प्रवेश केला की, दर्शनी भागी पूर्वेस श्री नागेश्वराचे शिवमंदिर आहे. या मंदिराच्या पश्चिमेस भव्य नि प्रशस्त कीर्तन मंडप दिसतो. सरदार पानसे यांनी मराठे विरुद्ध हैदर संग्रामात मेळकोट येथे युद्धात विजय मिळवून भरपूर लुट मिळवली. त्या वेळी त्यांनी सुंदर लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणि विष्णूच्या देवालयाचे चंदनाचे सुबक स्तंभ लुटीत बरोबर सोनोरीस आणले. हे चंदनाचे सहा कोरीव खांब भूतकाळातील समृद्ध कलेची साक्ष देतात आणि मराठ्यांच्या शौर्याची ग्वाही देतात.
कीर्तनमंडपानंतर मंदिरात लहानसा प्राकार आणि मध्य गाभार्यात दक्षिण भागी श्री विठ्ठल रुक्मिणीची कृष्ण पाषाणी सुंदर मूर्ती आहेत. तसेच वामांगी राम-लक्ष्मण व सीता या त्रयींच्या संगमरवरी मनोहर मुर्ती स्थापिलेल्या आहेत. गर्भागारात संतश्रेष्ठ सोपानदेवांची नितांन्त, मनोहर समाधी असून पार्श्वभागी गोपाळकृष्णाची उभी मुर्ती आहे.
सासवड मध्ये चांगावटेश्वर, सिद्धेश्वर व संगमेश्वर महादेवाची सुंदर दगडी बांधकामातील मंदिरे आहेत.
चांगावटेश्वर
सासवड-कापूरहोळ मार्गावरील चांगावटेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून जमिनी पासून साधारण पन्नास फुट उंचीवर आहे. हेमाडपंथी दगडी बांधकामातील मंदिर सभा मंडप,मध्यगर्भगृह व मुख्यगर्भगृह असे विभागले आहे.मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे, तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडपात उभा आहे. प्रवेशद्वारावरील स्तंभावर तपस्वी, दधि-मंथन करणारी स्त्री, गरुड, युगुल, लढत असलेले मल्ल, तीन नर्तकी असे शिल्प कोरलेले आहे. त्याच बरोबर चित्रविचित्र, आकर्षक, गोलाकार सौन्दर्याकृती, कमल पुष्पे, शृंखलांच्या माला, नृत्यांगना यांचे सुबक व कोरीव काम केलेले दिसते.
मानवी जीवनाच्या निरनिराळ्या प्रसंगातील भावनांचा
उत्कृष्ट रसाविष्कार करण्याचा नयनरम्य कलाकृती तद्वतच गेंडा, अश्व,
व्याघ्र, गजादी पशूंची चित्रे, पोपटासारखे पक्षी यांचे स्तंभावरील शिल्पकला
रसिकाला मंत्रमुग्ध करते. चौकोनाकृती मध्य गाभारा, शोडष स्तंभावर उभारलेला
असून त्याच्या प्रत्येक स्तंभावर सभामंडपाप्रमाणेच विविध कलाकुसरयुक्त
चित्राकृती, कमल पुष्पे, शृंखलांची घडण कोरलेली आहे. मंडपास दक्षिणोत्तर
प्रवेश द्वारे आहेत. मुख्य गर्भगृह नितांतरम्य, उदात्त नि पवित्र आहे.
त्यामुळे भाविक भक्तांच्या मनास सात्विक उदात्ततेचा अनुभव येतो. स्वयंभू
शिवलिंगाच्या पार्श्वभागी महिरपीच्या कोनाड्यात श्री गणेश देवतेची संगमरवरी
रम्य मूर्ती आहे. गर्भागारातील प्रत्येक पाषाण भिंतीस लहान कोनाडे आहेत. मंदिराचा घुमट अष्टकोनी गोलाकार आहे.तर मंदिरावर विटा, चुना व मातीतील निर्माण केलेले तीन कळस आहेत.
सिद्धेश्वर
सासवड शहराच्या पश्चिमेकडे दोन अडीच किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे. क-हा नदी उत्पत्ती काळातील भीमाने निर्माण केलेले व ब्रम्हदेवाने पुजलेले हे स्थान असल्याचे स्थानिकांची धारणा आहे.क-हा नदीचा निसर्गरम्य परि सर व शांत ठिकाणी असलेले देवालय ब्रम्हानंद मिळवून देते.वटेश्वर प्रमाणेच या मंदिराचे तीन विभाग आहेत नंदी मं डप मुख्य मंदिरा पासून वेगळा आहे तर मध्य गर्भगृह चौकोनी व प्रशस्त आहे त्याचे छत घुमटाकार आहे. अंतर गृह मध्ये सुंदर शिवलिंग आहे तर उजवीकडील कोनाड्यातून मध्य गर्भागृहाखालील तळघरात जाण्याचा मार्ग आहे. सरदार बिनीवाले यांच्याकडे मंदिराची व्यवस्था आहे
संगमेश्वर
सासवड
किल्ले पुरंदर मार्गावर पंचकमानी पुलावर उभे राहून पश्चिमेस नजर टाकली
असता जे नयन मनोहर रमणीय दृष्य दिसते, ते पाहून कोणीही पुलकित होईल. एका
बाजूने कर्हामाईचा पवित्र प्रवाह व दुसर्या बाजूने चांबळीचा प्रवाह
यांच्या सुंदर संगमावर हे प्रेक्षणीय शिवालय उभे आहे. दोन नद्यांच्या
संगमावर ते उभे असल्याने त्यास 'संगमेश्वर' मिळालेले नामानिधान यथार्थ नाही
असे कोणास वाटेल?
संगमेश्वराचे मंदिर म्हणजे पेशवेकालीन शिल्पाचा नि स्थापत्य कलेचा आदर्श
नमुना होय. मंदिरात जाण्यासाठी विशाल दगडी घाटाच्या पायर्या चढून वर जावे
लागते. आणि मग लागतो मंदिराचा चौकोनी आकारचा प्रशस्त दगडी प्राकार.
प्रवेशद्वार ओलांडले की, तीस दगडी स्तंभावर उभारलेला प्रवेशमंडप
सासवड शहर आणि परिसरातील प्रेक्षणीय स्थळांच्या विस्तृत महितीसाठी लॉग इन करा
वीर बाजी पासलकर स्मारक
शहाजीराजेंना
पुणे
जहागीर मिळाली होती.जिजाऊसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली
शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. त्यांच्या
सवंगड्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ होते ते बाजी पासलकर वय वर्षे पासष्ठ ते
सत्तर पण तरुणांना लाजवेल इतका दांडगा उत्साह. अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.महराजांनी कावजी
मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर
चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर
हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप
बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल
केली व पुरंदरचा पायथा गाठला. दुस-या दिवशी फत्तेखानचा सरदार मुसेखानाने
पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.
शत्रू
आवाक्यात येईपर्यंत पुरंदर शांत निवांत होता, मा-याच्या टप्प्यात आल्यानंतर
मराठ्यांनी जो हल्ला चढविला त्याने फत्तेखान आणि त्याचे साथीदार गडबडले.
तिस-या दिवशी फत्तेखानचा
सरदार मुसेखानने पुन्हा हल्ला चढविला पण लढताना त्याला
वर्मी घाव लागला आणि मुसेखान पडला म्हंटल्याबरोबर आदिलशाही फौज सैरावैरा
पळत सुटली क-हेपठारच्या मैदानावर पाठलाग करून गनीम कापला जात होता. या
पाठशिवणीच्या खेळात सासवडला हिंदवी स्वराज्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ
लढवय्या बाजी पासलकरांना कोंडीत पकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात यवन
यशस्वी झाले. अनेक जखमा अंगावर घेऊन बाजी अखेरपर्यंत लढले आणि धारातीर्थी
पडले.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर
सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा
करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.
बाजी
पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग
करण्याचा आदर्श निर्माण झाला.सासवड शहरामध्ये मध्यवस्तीत दुर्लक्षित अवस्थेत वीर बाजी पासलकरांची समाधी आहे. पुण्याजवळील वरसगाव जलाशयाला बाजी
पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.
कानिफनाथ मंदिर
नाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर
जेजुरी पासून तीस किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट
मार्गावर आहे.बोपगाव पासुन उजवीकडे मंदिराची कमान लागते वेडी वाकडी वळणे
घेत घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे. थोड्या पाय-या
चढून गेल्यानंतर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो, पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे. मुळचे मंदिर लहान
आहे,मंदिरामध्ये जाण्या साठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट
आहे, या चौकटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते.
आतमध्ये पंधरा वीस जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे.आतमध्ये प्रवेश
केल्यानंतर समोर दिसते ती यावनी दर्ग्या सारखी कानिफनाथांची समाधी.धूप व
फुलांचा सुगंध मन प्रफुल्लीत करतो. ज्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश केला तसेच
बाहेर पडावे लागते.मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही तसेच
पुरुषांसाठी सदरा व कंबरपट्टा बाहेर काढुनच आत प्रवेश करावा लागतो.
या टेकडीवरून दिवेघाट तसेच मस्तानी तलाव दिसतो.पावसाळ्यामध्ये येथून निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते.
किल्ले पुरंदर
अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी,
मध्येच वाहे क-हा, पुरंदर शिवशाहीचा तुरा.
जेजुरी
पासून साधारण २९ किमी वर किल्ले पुरंदर आहे.समुद्रसपाटीपासून ४५६० फुट
उंचीवर असलेल्या किल्ल्यावर लष्कराच्या तुकडीचे प्रशिक्षण केंद्र होते.पण
गेल्या काही वर्षात तेथील केंद्र बंद झाले आहे .लष्कराच्या तळापर्यंत
म्हणजेच भैरव खिंडी पर्यंत जाण्यासाठी डांबरी सडक आहे.तेथून पुढे
बालेकिल्ला व वज्रगडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय
दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नेऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या
पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे.
वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड
आहे.
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत आसून बचावाला
जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा
साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर
सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरुन सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता
येते. वीर मुरारबाजी देशपांडे
यांनी आपल्या पराक्रमाने अजरामर केलेल्या या किल्ल्यावर बिनी दरवाजातून
पुढे प्रवेश करताक्षणीच त्यांचा भव्य असा पुतळा दिसतो.पुरंदर व रुद्रमाळ
किंवा वज्रगड हे डोंगराच्या एकाच सोंडेवर असले तरी दोन स्वतंत्र किल्ले
आहेत.
इतिहास
पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे
स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील
पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वतचा काही भाग खाली
पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी
बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या
पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी नीळकंठ याने कसोशीने
हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे.
तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन
मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला.
हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून
घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून
शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले.
परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे
फत्तेखानाच्या स्वारीमूळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी
लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या
ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या
भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश
मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज
दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश
प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत
नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी
राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.
'तेव्हा
पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता.
त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे
लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली
दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल
वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर
युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले.
पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'
मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,
'अरे
तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी
बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो
की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने
आपले तीन तीर मारुन पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली,
'असा शिपाई खुदाने पैदा केला.'
पुरंदरचा तह
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे,किल्ल्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंद कडा, पद्मावती तळे, शेंद-या बुरुज, केदारेश्वर मंदिर, पुरंदर माची, भैरव खिंड, राजाळे तलाव व रुद्रमाळ किंवा वज्रगड असा संपूर्ण इतिहासाची साक्ष देणारा हा परिसर मनोहर आहे.केदारेश्वर हे पुरंदर किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाण आहे, येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्र्वर, रोहीडा, मल्हारगड, क-हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.
पुरंदरेश्वर मंदिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपर्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरात थोडे वरती गेल्यावर पेशवांच्या दुमजली वाड्याचे आवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो बांधला. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच दिल्ली दरवाजापाशी येतो.
दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसर्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
खंदकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखाना असल्याचे आवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे आवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
पद्मावती तळे: मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेंदर्या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदर्या बुरूज.
केदारेश्वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर
काही पायर्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन
जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. मंदिराचा जिर्णोद्धार केलेला
आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक
दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे
किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर,
रोहिडा, मल्हारगड, कर्हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे
एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
पुरंदर
माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्या वाटेने थेट
पुढे यावे म्हणजे आपण मचीवरील भैरावखींडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे
अनेक आवशेष दिसतात.
भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
श्रीक्षेत्र नारायणपूर
जेजुरी
पासून सव्वीस किलोमीटर अंतरावर किल्ले पुरंदरच्या उत्तरेकडील पायथ्याला
नारायण पेठ नामक गावठाण होते. ब्रिटीश कालावधीमध्ये याठिकाणी नव्याने गाव
वसविण्यात आले आणि याचे नारायणपूर असे नामकरण करण्यात आले.
पुरंदर किल्ल्यावर राहणा-या लोकांना लागणा-या चीजवस्तूंची बाजारपेठ
याठिकाणी होती असे ऐतिहासिक संदर्भांवरून वाटते, येथूनच किल्ल्याकडे जाणारी
पायवाट आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच
अतिशय सुंदर, आखीव रेखीव कोरीव काम असलेले भव्य नारायणेश्वर मंदिर स्थित आहे. या मंदिराचे बांधकाम यादवकालीन आहे असे
अभ्यासक मानतात. सर्व साधारणपणे शिवालये पूर्वाभिमुख असतात परंतु ऐतिहासिक दगडी बांधकाम असलेले हे मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या
दरवाज्यावर व मध्यगृहातील खांबांवर अतिशय बारीक कोरीवकाम आहे,अंतर गर्भगृहात सुंदर शिवलिंग आहे. पूर्वी
येथे घनदाट अरण्य असावे म्हणून या मंदिराला "बनातील नारायण" म्हणून ओळखले
जात होते. शिवकाळामध्ये नीलकंठराव सरनाईक यांच्या कारकिर्दीत मंदिराचा कळस
वीट व चुना यांचा वापर करून बांधण्यात आला. अलीकडील काळात
याची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
या
मंदिराला लागुनच दत्तात्रयाचे मोठे मंदिर
आहे. ऐंशीच्या दशकामध्ये नारायण महाराजांनी याठिकाणी दत्तात्रेयाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. पश्चिमाभिमुख
असलेल्या मंदिरामध्ये सुरवातीला छोटेसे त्रिमुखी दत्त मंदिर आहे तर त्याच
प्राकारामध्ये पाठीमागील बाजूस मोठी एकमुखी दत्तात्रेयाची उभी मूर्ती
असलेले मंदिर आहे. आधुनिक पद्धतीच्या मंदिरामध्ये संगमरवरी फरशी आणि भव्य
असा सभामंडप आणि त्यासोबतच सुंदर लोभसवाणे दत्तात्रेयाचे रूप पाहून मन
हरखून जाते. गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये प्रसिद्ध पावलेल्या या दत्त
स्थानाची महती दूरदूर पर्यंत पोहोचली आहे. सामुदायिक विवाह सोहळा,
व्यसनमुक्ती, सेंद्रिय खत निर्मितीसारखे सामाजिक उपक्रम येथे राबविले
जातात. गुरुवार व प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला येथे मोठी गर्दी होते.
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी येथे दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो, दत्तजन्म पाळणा हलवून दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...च्या
गजरात होतो. रात्री शोभेचे दारूकाम आणि दत्त्जान्माचे कीर्तन असे विविध
कार्यक्रम होतात. दुस-या दिवशी सकाळी उत्सव मूर्तींना आणि दत्तमहाराजांच्या
पादुकांना अभिषेक घालून पालखीमधून ग्रामप्रदक्षिणेसाठी सवाद्य मिरवणूक काढून नेले जाते. ग्रमप्रदक्षिणा चालू असताना गावामधील चंद्रभागा कुंडामध्ये उत्सव मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घातले जाते. या मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे उंट असा सर्व काही लवाजमा असतो दत्तभक्तांचा हा सोहळा पाहण्यसाठी महापूर लोटला जातो. .
एकाच ठिकाणी ऐतिहासिक आणि आधुनिक मंदिराचे बांधकाम या तीर्थक्षेत्री पहावयास मिळते.
बालाजी मंदिर
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला केतकावळे गावाच्या हद्दीत जेजुरीपासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर नव्याने निर्माण झालेले बालाजी मंदिर आहे. ज्या भाविकांना तिरुमला येथील तिरुपती बालाजी च्या दर्शनासाठी जाणे शक्य नाही त्यांना येथे दर्शन मिळावे, अन त्यासाठी पुण्याजवळ मंदिर उभारावे असे व्यंकटेश हॅचरीज संस्थापक स्व.बी.व्ही.राव यांचे स्वप्न होते. त्यांच्या पश्चात केतकावळे येथे उत्तरा फिडस कंपनी शेजारी दहा एकर परिसरामध्ये बालाजी मंदिर उभारले आहे. मंदिरातील पूजा व्यवस्था तिरुपती देवस्थानचे पुजारी पाहतात. शांत निवांत परिसर, दक्षिण भारतीय संगीत, मंदिरातील सजावट यामुळे मन अगदी प्रसन्न होते.
सदानंदाचा यळकोट