Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

कला व संस्कृती

श्रीक्षेत्र जेजुरी जशी खंडेरायाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती सांस्कृतिक राजधानी म्हणूनही प्रसिद्ध आहे. जेजुरीला ही ओळख मिळाली ती येथील प्रतिभाशाली लखलखत्या हि-यांमुळे,अशा लखलखत्या हि-यांमुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील आणि देशाबाहेरील रसिकांचे रंजन होते. अनेक लहान मोठे कलाकार या नगरीमध्ये जन्माला आले, वाढले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून जेजुरनगरीचे जगभर गाजविले. शाहिरी, गायन, तबला आणि ढोलकी वादन, हार्मोनियम, चित्रपट, नाटय आणि तमाशा अशा सर्वच कलाप्रकारामध्ये जेजुरीचे तारे चमकले आणि अजूनही त्यांची घोडदौड तशीच चालू आहे.

कुलधर्म कुलाचार

प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान वाटत असतो, पण कुळ म्हणजे काय ? कुलधर्म कुलाचार म्हणजे काय ? त्याचे पालन कसे करायचे ? कुलस्वामी खंडोबाचे कुलाचारातील विधी कसे पार पाडायचे वगैरे संपर्ण  माहिती


Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

शीघ्रकवी शाहिर सगनभाऊ

तुणतुण्याला ताण देऊन डफावर थाप पडली की मराठी मन शहारून उठतं. नसानसातून शूरत्वाचा वारसा सळसळू लागतो. देदिप्यमान इतिहासाबद्दल अनन्यसाधारण अभिमान बाळगणारे मराठी मन पोवाड्यांमधील पराकमांच्या वर्णनाने भारावून जाते. शाहिरी ही संकल्पना जरी अन्य भाषेतून घेतली गेली असली, तरी तिचा गाभा मात्र मराठीपणाने रसरसलेला आहे. ही कला पूर्णत्वाने महाराष्ट्राच्या जीवनाशी एकरूप झालेली आहे. तिच्या अंतरंगातून महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडत जातो. पेशवाईच्या काळात वीर रसाबरोबरच, शृंगार रसाचीही शाहिरीमध्ये भर पडली. श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि  दुसरे बाजीराव पेशवेंच्या कालखंडामध्ये शाहिरीला राजाश्रय मिळाला. उत्तर पेशवाईत मराठी शाहिरांच्या प्रतिभेला बहर आला होता. मराठी स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचे चित्रण करणारे लावणी वाङ्मय भरभरून लिहिणारे, अनंतफंदी (इ.स. १७४४ ते १८१९), रामजोशी (इ.स.१७५८ -१८१३ ), शाहीर परशराम (१७५४ -१८४४ ),होनाजी बाळा (१७५४ -१८४४ ),प्रभाकर (१७५२ -१८४३ ) सगनभाऊ (१७७८ -१८५० ) यांच्या जीवनासंबंधी आणि तत्कालीन मराठी भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लावण्यांविषयी आजतागायत मराठी माणसांच्या मनात कुतूहल आणि आकर्षण आहे.
शाहिर सगनभाऊ हे पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहिर, कोणतीही  साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे नावलौकिकास पात्र ठरले. शाहिर सगनभाऊ मूळचे जेजुरीचे रहिवासी, वंश परंपरेने आलेल्या शिकलगारीच्या व्यवसायात मन रमेना आणि काव्यप्रतिभा स्वस्थ बसू देईना म्हणून पुण्यची वाट धरली आणि नामवंत शाहिरांसोबत आपली कवनं सादर करू लागले थोड्याच कालावधीत यश आणि प्रसिद्धी मिळविली.
सगनभाऊ जातीचे मुसलमान असूनसुद्धा ते मराठीशी, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरुप झाले होते, ग्रामीण जीवनशैलीशी त्यांची जी नाळ बांधली होती ती त्यांच्या शाहिरीतून दिसून येते.

उत्तर मराठेशाहीतील सर्वात मोठी घटना आणि मराठ्यांच्या मनात असणारी सल म्हणजे पानिपतची लढाई, या लढाईवर सगनभाऊनी दीर्घ पोवाडा लिहून त्याकाळातील परिस्थितीवर सुंदर भाष्य केले आहे. श्रीखंडेरायावर त्यांची अपार श्रद्धा आणि या श्रद्धेतूनच त्यांनी हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्र व देव देवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले, हीच रचना खंडेरायाच्या भूपाळी मध्ये म्हंटली जाते.

खडकीच्या लढाईवरील पोवाडा, दुस-या बाजीरावां वरील पोवाडा, पानपतचा पोवाडा हे त्यांचे काही प्रसिध्द पोवाडे, "दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी । लेकराला माय विसरली, कसा ईश्वर तारी' असे खडकीच्या लढाईनंतर झालेल्या अव्यवस्थेचे वर्णन त्यातील उपमांमुळे प्रभावी ठरते.
होनाजी शिलारखाने व त्यांचा गायक साथीदार बाळा करंजकर असे एकत्रित होनाजी बाळा नाव मिळाले, त्याप्रमाणेच मुस्लीम धर्मीय सगन आणि कोथळे गावचा रहिवासी भाऊ गोंधळी, हा त्याचा सहगायक होता, म्हणूनच सगनभाऊ असे नामाभिधान त्याला मिळाल्याची समजूत आहे.
आजही जेजुरीकरांच्या मनामध्ये शाहिर सगनभाऊ यांच्याविषयी आभिमान आहे, दरवर्षी ऑक्टोबर- नोहेंबर महिन्यामध्ये चार दिवसांचा संगीत महोत्सव भरविला जातो. यामध्ये ही रात्र शाहिरांची, रंगल्या रात्री अशा, लोकसंगीत आणि लोकनाट्य असे कार्यक्रम असतात. महाराष्ट्रातील नामवंत शाहिर आणि कलाकार या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणे हे भाग्याचे समजतात.      श्रीक्षेत्र जेजुरीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू असणा-या शाहिर सगनभाऊना www.jejuri.in परिवाराच्या वतीने त्रिवार सलाम.....





लावणीसम्राज्ञी रोशन सातारकर

रोशन सातारकर नुसतं नाव जरी ऐकल तरी ठसकेदार लावणीची आठवण व्हावी अस वलय या नावाभोवती होत. मूळचे रुख्मिणी नाव कालौघात केव्हा मागे पडले हे त्यांना हि सांगता येत नसे. साठ आणि सत्तरच्या दशकात सुलोचना चव्हाण आणि रोशन सातारकर हि दोन नाव लावणी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करीत होती तो काळ म्हणजे लावणीचे सुवर्णयुग होते लावणी कधी तमाशाप्रधान चित्रपटामधून तर अल्बम द्वारे झळकत होती.त्यातही सुलोचनाबाई लावणी फक्त गातात पण रोशनबाई लावणी सादर करीत असत. रोशनबाईंची लावणीतील अदाकारी लोक कलेच्या प्रांतातील मैलाचा दगड ठरली. याबाबत घडलेली एक घटना आठवते ती एका मैफिलीत 'येऊ कशी ...' लावणी सादर करीत असताना डोक्यावर गाठोडं घेतल्याच्या प्रसंगात गाठोडं सदृश्य जवळ काहीच ना मिळाल्याने त्यांनी चक्क तबलेवाल्याचा डग्गा डोक्यावर घेऊन प्रसंगावधान राखले. त्यांची हि अदाच रसिकांना भावली व त्यांना उदंड लोकप्रियता मिळाली. तमाशा फडावरची लावणी माजघरात पोहोचविण्याचे श्रेय रोशनबाईनाच जाते. पुण्यातील आर्यभूषण थिएटर मध्ये खास महिलांसाठी प्रयोग सादर केले जायचे आणि तेही अगदी हाउसफुल होत असत. लोकप्रियता आणि रोशन बाई यांचे एक अतूट समीकरण होते, सत्तरच्या दशकात रोशन सातारकर संगीत पार्टीचे कार्यक्रम विदर्भ दौ-यावर होते त्याकाळात नागपूर मध्ये कार्यक्रम असताना रोशनबाईना पाहण्यासाठी रस्त्यावर इतकी अलोट गर्दी लोटलेली असे कि शेवटी बाईना बुरख्यामध्ये पोलीस बंदोबस्तात थिएटरवर नेण्याची जबाबदारी अनेकदा संयोजकांवर येत असे. अशी लोकप्रियता खचितच एखाद्या लावणी सम्राज्ञीला मिळाली असेल. ज्येष्ठ गायिका लतादीदी मंगेशकर यांनी रोशनबाईंच्या आवाजातील लावणीच्या कुतुहुला पोटी बाईना खास घरी निमंत्रण देऊन मैफिलीचे आयोजन केले होते.Placeholder Image

रोशन बाईनी शृंगारिक लावण्यांबरोबर "माझ्या नव-यान सोडलीय दारू" सारख्या प्रबोधन करणा-या लावण्या तसेच उडत्या चालीवरील "डार्लिंग डार्लिंग" सारखी गाणी गायली. अखेरच्या काळामध्ये तमाशाचे बदल लेले स्वरूप पाहून त्यांचे मन विषण्ण होत असे. शासन दरबारी त्यांची दाखल घेतली नाही याची त्यांना खंत होतीच पण रसिकांकडून मिळालेले प्रेम त्यांना महत्वाचे वाटे.बुधवार दिनांक २१ सप्टेंबर२००५ रोजी जेजुरीमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि वयाच्या सातव्या वर्षापासून सत्तराव्या वर्षापर्यंत झळकणारे रोशन नावाचे लावणी युग अस्ताला गेले.


सिनेअभिनेत्री लिला गांधी

तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. लावणी नृत्य हे या चित्रपटामधील आत्मा होते आणि नृत्य दिग्दर्शनाची सर्वस्वी जबाबदारी घेणारी नवखी परंतु खंबीर व सुंदर स्त्री होती जेजुरीकन्या लिला गांधी. श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये शाहिर सगनभाऊच्या कलेचा  वारसा चालविणा-या व लोककला सादर करणा-या कोल्हाटी समाजातील एका गरीब कुटुंबामध्ये लिला गांधींचा जन्म झाला. आई नामांकित तमाशा कलावंत असल्याने जन्मतःच संगीत व नृत्य त्यांच्या नसनसात भिनले होते, वयाच्या आठव्या वर्षी गुरु गोविंद निकम यांचेकडे नृत्य (कथ्थक)साधनेला सुरुवात केल्यानंतर एकदा मास्टर भगवान यांच्यासमोर सादर केलेल्या नृत्यामुळे, हिंदीतील 'रंगीला' चित्रपटाचेवेळी नृत्य करवून घेण्याची संधी मिळाली,अशा त-हेने त्यांची चित्रपट सृष्टीतील वाटचाल सुरु झाली.
अनंत माने यांच्या प्रीतीसंगम चित्रपटाद्वारे त्यांना संपूर्णपणे नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली, या चित्रपटामध्ये  त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि अनंत मानेंनी दाखविलेला विश्वास ही सार्थ करून दाखविला.
त्यांच्या रुपेरी कारकीर्दीवर पहिली यशाची मोहोर उठविणारा चित्रपट सुद्धा अनंत मानेंनी दिला.

Placeholder Image

सन १९५९ मध्ये आलेल्या 'सांगत्ये ऐका' या चित्रपटाने यशाचे अनेक दरवाजे लिलाबाईंसाठी खुले केले. या चित्रपटामध्ये हंसा वाडकर आणि जयश्री गडकर यांच्या सारख्या नामांकित अभिनेत्रींना नृत्य दिग्दर्शन तसेच पडद्यावर वसंत शिंदे यांच्या सोबत 'सांगा या वेडीला' हे गाणे सादर करण्याची संधी मिळाली. चित्रपट सृष्टीमधून अत्यल्प मोबदला मिळत असल्याने चरितार्थासाठी लिला गांधी लोकनाट्यामधूनही काम करीत होत्या. 'सांगत्ये ऐका'चे चित्रीकरणाचे वेळी हंसा वाडकर या ज्येष्ठ अभिनेत्रीला एका तमाशा कलावंताकडून नृत्य शिकणे मनाला पटेना त्या अडून बसल्या पण अनंत माने आपल्या भूमिकेवर ठाम होते त्यांनी हंसाबाई व जयश्री बाईना लीलाबाईंचे नृत्य पाहून पुढील निर्णय घेण्यास सुचविले त्याप्रमाणे लिलाबाईंच्या नृत्यातील गिरक्या आणि पदलालित्य पाहून दोघीही चाट पडल्या. दोघींनीही त्यांना नृत्यगुरु मानून त्या सांगतील त्याप्रमाणे सादरीकरण केले आणि पुढे पडद्यावर जो इतिहास घडला तो सर्वांनाच ज्ञात आहे.
हा चित्रपट पुण्यात विजयानंद थिएटर
मध्ये १३१ आठवडे चालला,अनेक ठिकाणी सर्व कलासंचाचे सत्कार सोहळे होत होते. 'सांगत्ये ऐका' मधील 'काल राती मजसी झोप नाही आली' या लावणीचे चित्रीकरण हंसा वाडकरांवर करण्यात आले होते त्या नृत्याची आणि त्यातील गिरक्यांची रसिक मुक्त कंठाने प्रशंसा करीत पण हंसाबाईना त्यावेळी संकोच वाटे कारण त्यातील गिरक्यांची दृश्ये त्यांच्या डमी म्हणून लिलाबाईंवर चित्रित करण्यात आली होती. स्वतः हंसाबाईंनीच याचा गौप्यस्फोट 'रसतरंग' मध्ये केला.Placeholder Image
'केला इशारा
जाता जाता', 'देवा तुझी सोन्याची जेजुरी' सारखे तुफान यशस्वी चित्रपट केल्यानंतर १९६७ पासून त्यांनी चरित्र अभिनेत्रीची भूमिका करण्यास सुरवात केली. 'संत गोराकुंभार', 'चोरावर मोर' सारख्या चित्रपटातून खाष्ट कावेबाज खलनायिकेच्या भूमिका केल्या. हृषीकेश मुखर्जींच्या 'अशिर्वाद' मध्ये अशोककुमार यांच्याबरोबर नृत्यातून सवाल जवाब सादर करण्याची संधी त्यांना मिळाली.
चित्रपटाबरोबरच रंगभूमीवर 'सोळावं वरीस धोक्याच', 'कथा अकलेच्या कांद्याची' सारखी नाटकं त्यांनी सादर केली. अरुणा इराणींच्या गुजराथी नाटकामध्ये आणि संस्कृत मधील 'कालिदास' मध्येही त्यांनी भूमिका केल्या. एकुलत्या एक लहान मुलाचा अंत आणि घरगुती अडचणी यांच्यावर मात करीत त्यांनी आपली कारकीर्द फुलविली योग्य वेळ येताच त्यांनी या क्षेत्रातून सन्मानाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि १९७९ पासून रंगभूमीवरील काम थांबविले आणि १९८३ पासून चित्रपटसृष्टीमधूनही निवृत्ती स्वीकारली.
आज त्या पुण्यामध्ये निवृत्त जीवन व्यतीत करीत आहेत परंतु समाजकार्याची अंतरीक ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही, अनेक दुर्लक्षित कलावंताना मानधन मिळवून देणे त्यांच्या विविध समस्या सोडविणे अशा कामाध्ये त्यांचा दिवस जातो. शासनाच्या 'रंगभूमी कर्मी' या संस्थेवर संचालक म्हणून काम पाहतात तर मध्यंतरी कॉसमॉस सहकारी बँकेच्या संचालिका म्हणूनही काम केले.
शाहिर सगनभाऊ स्मृती मंडळातर्फे दिला जाणारा 'शाहिर सगनभाऊ पुरस्कार' आणि जेजुरी देवस्थानकडून 'मल्हाररत्न' पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांना अनेक मान सन्मान मिळाले, नाव ,प्रसिद्धी यश कीर्ती आणि पैसा सर्व काही मिळाले पण इथल्या मातीशी जुळलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. मिळालेल्या यशाने त्या कधीच हुरळून गेल्या नाहीत जन्मभूमी जेजुरीचा त्यांना कधीही विसर पडला नाही किमान वर्षातून एकदा तरी खंडेरायाच्या दर्शनाला यायचे हा त्यांचा नेम ठरलेला आहे. शाहिर सगनभाऊ स्मृती कला मेळाव्याला त्यांची आवर्जून उपस्थिती असते. अशा या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंताला 'जेजुरी.इन' च्या वतीने मनाचा मुजरा.


गुरुवर्य हरिभाऊ उर्फ आबासाहेब कुदळे

हरिभाऊ उर्फ आबा कुदळे हे कसलेले तमाशा कलावंत आणि लोकनाट्य क्षेत्रातील वंदनीय गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. उपेक्षित असलेल्या कोल्हाटी समाजासारख्या भटक्या विमुक्त जमाती मध्ये जन्माला आलेले आबासाहेब कुदळे पन्नास वर्षे लोकनाट्य तमाशा क्षेत्रात काम करीत होते. त्यांचे वडील शंकरराव कुदळे यांनी मोठ्या कष्टाने त्यांना आणि त्यांचे भाऊ महादू मास्तर यांना संगीत शिक्षण दिले. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही हरीभाऊंनी तबला, ढोलकी यांचे शिक्षण पुण्यातील गंधर्व विद्यालयातून पूर्ण केले. तिथे त्यांनी तबला व ढोलकी या वाद्यांबरोबरच 'पखवाज' वादक म्हणून 'विशारद' पदवी प्राप्त केली.
त्यांच्या दोघी बहिणी पारूबाई जेजुरीकर आणि हौसा जेजुरीकर गायिका होत्या, घरातील पूरक वातावरणामुळे लोकनाट्यातील प्राण असलेल्या लावणीचे सर्व प्रकार दोघींनाही अवगत होते आणि त्याच तोडीची साथ त्यांना बंधूद्वयांकडून मिळत गेली, आबांनी त्यांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे केले. दोन्ही बहिणींचे निधन झाल्यानंतर १९६८ साली त्यांचा नाटय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. अनेक संगीत नाटकांना त्यांनी तबला व ढोलकीची साथ संगत केली . त्यामध्ये विद्याधर गोखले व जयमाला शिलेदार यांच्या नाटकांचा समावेश होता. प्रसिद्ध सिनेअभिनेता निळू फुले यांच्याबरोबर ' कथा अकलेच्या कांद्याची' या नाटकाला त्यांनी तबला व ढोलकीची साथ दिली. या नाटकाचे हरिभाऊनी सुमारे १०८ प्रयोग केले. त्याबरोबरच सुर्यकांत मांढरे, अरुण सरनाईक, उषा चव्हाण, उषा नाईक अशा दिग्गज सिनेकलावंतासोबत आबासाहेब तबला, ढोलकी आणि पखवाज यांची साथ संगत करीत असत.अनेक तमाशा फडांमध्ये प्रवास केलेल्या आबांनी अनेक नामवंत शाहिर आणि कलाकारांना साथ संगत केली आहे. १९७४ साली ते मुंबईच्या राजकमल स्टुडीओ मध्ये नोकरी करू लागले त्या काळात त्यांनी अनेक मराठी - हिंदी गीतांना साथ संगत केली. ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचे सोबत 'गीत रामायण' तर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये राम कदम यांच्या बरोबर 'पिंजरा', विश्वनाथ मोरे यांच्यासोबत 'सुंदरा सातारकर' सारखे गाजलेले चित्रपट केले.  हिंदीमध्ये 'अपनापन'  या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना साथ केली. त्यांना अनेक मान सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. 

शाहिर सगनभाऊ यांच्या विषयी आबांच्या मनामध्ये नितांत आदर होता, त्यांच्या लावण्या आणि जीवनपट सर्व सामन्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आबांनी स्वखर्चाने छोटीशी पुस्तिका प्रसिद्ध केली होती.शाहिर सगनभाऊ स्मृती मंडळाचे अध्यक्षपद वर्षानुवर्षे अगदी अखेरपर्यंत त्यांच्याकडे होते. त्यामुळेच दरवर्षी शाहिर सगनभाऊ पुण्यतिथी साजरी करीत असताना नामांकित कलाकारांसोबातच नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील असत.शाहिर सगनभाऊ स्मृती व्यासपीठाची महती आणि गुरुतुल्य आबांच्या शब्दाला मान देवून अनेक नामांकित कलाकार कमी मानधनामध्ये जेजुरीमध्ये हजेरी लावत असत. दरवर्षी नियमितपणे विजयादशमी नंतर चार दिवस कलाकारांचा मेळा सगनभाऊ पुण्यतिथी निमित्त भरत असे. जेजुरी पंचक्रोशीतील रसिकांना सहकुटुंब सहपरिवार शाहिरी, लावण्या आणि लोकनाट्य पाहण्यास मिळावे याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असे.
अखेर पर्यंत कलेची सेवा करण्यातच आबांनी धन्यता मानली अखेरच्या काळामध्ये अनेक होतकरू आणि गरजूंना आबांनी तबला वादनामध्ये प्रशिक्षित केले. १५ मार्च २०११ रोजी
आबांनी अखेरचा श्वास घेतला आणि कलाक्षेत्रातील गुरु, शाहिर सगनभाऊ स्मृती मंच पोरका करून अस्ताला गेला.


aaa

Bookmark and Share