खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव
देवी महात्म्य
हिंदू संस्कृती प्रमाणे कुलस्वामी आणि कुलस्वामिनी दोन्ही दैवतांची पूजा व्हावयास हवी.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोल्हापूर येथे श्रीमहालक्ष्मीचा सदैव वास असतो. भगवान परशुरामांची आई रेणुकामातेचे अधिष्ठान असलेले मातापूर (माहूरगड) हे दुसरे शक्तीपीठ आहे. तुळजापूर हे तिसरे पीठ असून सप्तशृंग (वणी) हे अर्धपीठ आहे. या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी असलेल्या शक्ती स्थळांची संक्षिप्त माहिती....
nice temple and ,well maintained
Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!
its nice....!!!
Very good temple and there facilities
Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted
Comments for this guestbook have been disabled.
साडेतीन शक्तिपीठांची कथा
कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता ।
मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ।
महाराष्ट्रातील
साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री
महालक्ष्मी-देवीचा सदैव वास असतो. भगवान परशुरामांची आई रेणुकामातेचे
अधिष्ठान असलेले मातापूर (माहूरगड) हे दुसरे शक्तीपीठ आहे. तुळजापूर हे
तिसरे पीठ असून सप्तशृंग (वणी) हे अर्धपीठ आहे.
पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या
यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला
आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे
सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा
विध्वंस केला. सतीचे कलेवर (देह) हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू
लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे ५१
तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५१ शक्तिपीठे
म्हणून गणली जाऊ लागली.
यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची
महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली आणि
वणीची सप्तशृंगी देवी ही ती पीठे होत..
देवी मंदिरात करावयाचे काही धार्मिक विधी
श्री महालक्ष्मी देवी
एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. श्रीमहालक्ष्मीदेवीने त्याचा वध केला. कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे श्रीमहालक्ष्मीने मान्य केले.
देवीभागवत, पद्मपुराण, स्कंदपुराण आदी पुराणांतही करवीर शक्तीपिठाचा उल्लेख आढळतो. पद्मपुराणात ‘श्री करवीर माहात्म्य’ असून त्यात नैमिषारण्यात अनेक ऋषींनी सूतांना विचारलेल्या प्रश्नोत्तरांचा सारांश दिला आहे. करवीर नावाचे हे क्षेत्र १०८ कल्पांचे (४,३२,००,००,००० मानवी वर्षे म्हणजे १ कल्प) असून त्याला ‘महामातृक' असे म्हणतात. येथे श्रीविष्णु श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपाने वास करतात. या करवीर नगरीला ‘दक्षिण काशी’ असेही म्हटले जाते.
बर्याच विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे, त्याचे बांधकाम चालुक्याच्या उत्तर काळात झाले. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्या काळ्या दगडात केलेली आहे. देवळाचे शिखर व घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. देवालय आकाराने एखाद्या फुलीप्रमाणे आहे. हेमाडपंती वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी दरजा न भरता, एकमेकावर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी दगडात केलेली आहे. देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.
मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले, त्याला १ लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. गरूड मंडप / सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्यावर ठेवून तिची पूजा करतात. देवळाच्या निरनिराळ्या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत.
- पालखी प्रदक्षिणा : प्रत्येक शुक्रवारी रात्री देवीला पालखीत बसवून देवळाच्या आवारात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. अशीच पालखी प्रदक्षिणा आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या पाच मासांतील (महिन्यांतील) पौर्णिमेला निघते.
- गंधलेपन पूजा : चैत्र मासात वसंतपंचमीच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची गंधलेपन पूजा बांधली जाते.
- रथोत्सव : प्रतिवर्षी चैत्र कृष्ण प्रतिपदेला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव साजरा केला जातो. या वेळी देवीला रथात बसवून तिची मिरवणूक काढली जाते.
- अलंकार पूजा : वैशाख मासात येणार्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी देवीला झोपाळ्यावर बसवून तिची भरजरी वस्त्रे आणि रत्नजडित अलंकारांनी युक्त अशी अलंकार पूजा बांधली जाते. झोपाळ्यास झोके दिले जातात.
- शारदीय नवरात्रोत्सव : आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्री महालक्ष्मीदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दसर्याच्या दिवशी शिलंगणासाठी (सीमोल्लंघनासाठी) देवीची पालखी निघते.
- महाप्रसाद : आश्विन पौर्णिमा हा श्री महालक्ष्मीदेवीच्या महाप्रसादाचा दिवस.
- दीपोत्सव : हा सोहळा दीपावलीच्या दिवसापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो. या पंधरा दिवसांत प्रतिदिन देवीला दुग्धस्नान घालतात.
- किरणोत्सव : प्रतिवर्षी
कार्तिक मासात साधारणपणे ९, १० आणि ११ नोव्हेंबर असे तीन दिवस, तसेच माघ
मासात ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असे तीन दिवस देवीचा किरणोत्सव
साजरा होतो. पहिल्या दिवशी सूर्यदेवाचे किरण देवीच्या चरणांना स्पर्श
करतात. दुसर्या दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मध्यभागावर येतात आणि
तिसर्या दिवशी ते देवीच्या मुखमंडलासह संपूर्ण मूर्तीला प्रकाशात न्हाऊन
काढतात.किरणोत्सवाच्या प्रसंगी
देवीची सालंकृत पूजा केलेली असते. सूर्यकिरणांनी मूर्तीला स्पर्श
करण्याच्या आधी सर्व विद्युत दीप मालवून गाभार्यात केवळ दोन समया तेवत
ठेवल्या जातात. काही मिनिटांनंतर सूर्यकिरण गेल्यावर देवीची कर्पूरारती,
तसेच देवळात घंटानाद केला जातो.
श्रीरेणुका माता
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला .
तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले . शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी
ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत .
सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा
सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला . ऋषीकडे कामधेनू कशाला हवी ? ती
माझ्यासारख्या पराक्रमी राजाकडेच अधिक शोभून दिसेल , असे सांगत त्याने
जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा
पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्त्रार्जुनाने
आश्रमावर हल्ला केला . आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व
कामधेनू हिरावून नेली . नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार
बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला
अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात
जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत
अखेर तो माहूरगडावर आला . तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला
कोरी भूमी दाखवली व ' इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर ' असे सांगितले .
परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले . या
पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका
सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .
त्यानंतर
परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो दु : खी होऊन शोक करत
होता , तोच आकाशवाणी झाली . ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .
फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने
त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर
आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला
पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला '
मातापूर ' म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते '
माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले .
प्राचीन काळी माहूरचे जंगल ' अमलीवन ' म्हणून प्रसिद्ध होते . या परिसरात रेणुकामाता , दत्तात्रेय , अनसूयामाता या तीन डोंगरावर असलेल्या मंदिरांना जोडणारा माहूरचा डोंगरकिल्ला एकेकाळी सत्तेचे केंद्र होता. एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू , सहा मैलाचा परिसर व्यापणारी तटबंदी आज मात्र उपेक्षित राहिली आहे . आजही ' हत्तीदरवाजा ', किल्ल्यावरचे प्रचंड तळे ( ब्रह्माकुंड ), कारंजी , हौद यांचे अवशेष असलेला ' चिनी महाल ' मध्ययुगीन वैभवाची साक्ष देतो .
१४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा या परिसरातली मंदिरे , तीर्थस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली होती . पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला . रेणुकेचे मंदिर लहानसे असून प्रवेशाचा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजावर नगारखाना आहे. प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे . अलीकडे दर्शनाच्या सोयीसाठी या वास्तूत काही बदल करण्यात आले आहेत . या सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणा-या महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत .
मूर्ती
अन्य शक्तीपीठात देवीच्या मूर्ती असताना माहूरला रेणुकामातेचा तांदळा का पूजला जातो याच्या अनेक पुराणकथा व दंतकथा प्रचलित आहेत .सभामंडपवजा मंदिरात ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे . देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे .
मंदिरातील काही महत्त्वाचे उत्सव
देवीला खलबत्त्यात पान कुटून
नैवेद्य दाखवितात. नवरात्रीत येथे नऊ दिवस मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव
साजरा केला जातो. यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात.
नवरात्रीच्या काळात आणि एरव्हीही दागिन्यांनी नटलेली असते
श्रीतुळजाभवानी माता
कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.
मंदिराची रचना
डोंगराच्या पश्चिम उतरणीवर हे देवास्थान असल्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी ९३ पायऱ्या उतराव्या लागतात. भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून
तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे
आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व
उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या
तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ
लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे
हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे
गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो.दरवाजा
ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला
आहे. चौघडयाच्या पायऱ्या उतरल्यावर मंदिराचा प्रभार लागतो.
देवीच्या मंदिराभोवती प्रशस्त आंगण, ओवऱ्या व दगडी तट आहे. मंदिराच्या
दर्शनी बाजूला एक होमकुंड आहे व त्यावर शिखर बांधले आहे. देवीचे मुख्य
मंदिर एका दरीत वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आतील मंडप सोळखांबी
मंडपाच्या तत्वावर आधारलेला आहे. पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास व
पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.
मंदिराच्या रचनेचे एक अनोखे वैशिष्ट्य
गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे. तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
मूर्ती
गाभा-यात
पश्चिमेकडील बाजूस मधोमध एका उंच सिंहासनावर आई भवानीची मूर्ती
आहे. देवीची मूर्ती तीन फूट उंचीची असून काळ्या रंगाच्या पाषाणाची
प्रभावळीसह सूटी अशी उभी आहे. ही मूर्ती इतर शक्ती स्थळांसारखी स्वयंभू
नसून पालखी पर्दक्षिणा आणि निद्राकालामध्ये मूळ स्थानावरून हलविली जाते.
तिच्या डोक्यावर अंगच्या अशा मुकूटावर
सयोनीलिंग आहे. मुकूटाखालून केसाच्या बटा बाहेर आलेल्या दाखविल्या आहेत.
देवीची मूर्ती ही अष्टभुजाधारी आहे. हातात त्रिशूल, बाण, चक्र, शंख,
धनुष्य, बिचवा, पानपात्र व राक्षसाची शेंडी या वस्तू आहेत. पाठीवर भाता
लटकविलेला आहे. देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगास चंद्र व सुर्य
आहेत. उजवा पाय महिषासुराच्या उरावर ठेवलेला आहे. त्याच्या उजवीकडे देवीचे
वाहन सिंह आहे. त्याखाली मार्कंडेय ऋषी दाखविले आहेत. देवीचा डावा पाय
जमिनीवर असून दोन्ही पायांच्या मधोमध तूटलेले महिषासुराचे मस्तक आहे.
डाव्या हातात खाली डोके वर पाय करुन तपस्या करणारी तापसी अनुभूती दाखविली
आहे. तिच्या अंगावर चक्रकुंडले, केयूर, अंगद, साध्या व मोत्याच्या बांगडया,
कंठा, माला, मेखला, साखळ्या व पदबंध एवढे दागिने दाखविले आहेत. देवीने एका
डाव्या हाताने महिषासुराची शेंडी धरली आहे व एका उजव्या हाताने त्याच्या
बरगडयात त्रिशूळ खूपसलेला आहे.
देवीला पूजा-यांव्यतिरिक्त कोणालाही स्पर्श
करता येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जाते. आता मात्र
सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.
सप्तश्रृंगी माता
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी
अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय.
सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात
येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर
तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास
सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे
मूळ पीठ मानले जाते.श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक,
साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे
सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून
माहात्म्य सांगीतले जाते. या स्थानाचा `नवनाथ कालावधी' स्पष्टपणे सांगता
येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने
नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर,
पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध
होता असे म्हटले जाते.
नाशिकच्या उत्तरेस चांदवड डोंगरच्या रांगेत एक सप्तश्रृंगी पर्वत आहे. या पर्वताला सप्तश्रृंगे (सात शिखरे) आहेत म्हणून याला सप्तश्रृंग म्हणतात. देवीच्या पीठाच्या समोरील डोंगराला मार्कंडेयांचा डोंगर असे म्हणतात. या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे.
नाशिकपासून नांदूरी गाव ५८ कि.मी. आहे. नांदूरी गाव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशीच वसलेले आहे. नांदूरीहून गडावर येण्यास एक रुंद अशी पायवाट आहे. या पायवाटेने येणा-यास तीन घाट चढून यावे लागते. नांदूरीपासून आपणास गाडीची सोय उपलब्ध आहे. या गडावर आता पाण्याची चांगली सोय झालेली आहे. गडाचा चढ चढून मध्यसपाटीवर आले की सप्तश्रृंग हा सूमारे ५०० ते ६०० लोकवस्तीचा गाव लागतो आता कदाचित. येथे थोडी विश्रांतीसाठी धर्मशाळा, उपहारगृह आहेत गडावर देवीपर्यंत जाण्यास ४७२ पायऱ्यांचा दुसरा टप्पा चढून वर जावे लागते. या पाय-या चढतांना पायात पादत्राणे घालण्यास बंदी आहे. दोनशे पाय-यावर रामाचे मंदिर असून त्यास रामाचा टप्पा असे म्हणतात. यानंतर कासव कोरलेला भाग आढळतो त्याला कासवाचा टप्पा असे म्हणतात. त्याच्यापूढे औदुंबराचे एक झाड लागते. या सर्व पाय-या चढून गेल्यानंतर देवीचे मंदिर लागते.
सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.
मूर्ती
पर्वतशिखराच्या मधोमध गुहाकृती अशी १८-१९ फुट उंचीची कपार आहे त्या कपारीत खोलवर महिरप कोरली असून त्या महिरपातच श्रीसप्तश्रृंगी देवीची आठ फुट उंच अशी मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती अतिशय भव्य, शेंदुरचर्चित रक्तवर्णी आहे. या देवीची पूजा शिडी लावूनच करावी लागते. या देवीला अठरा हात आहेत. देवीच्या प्रत्येक हातात एक एक आयुधे आहेत. उजव्या बाजूला खालून वरती मणिकमाळा, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड आहे. डाव्या बाजूला वरुन खाली शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनूष्य, पानपात्र, कमंडलू आहेत. या देवीला अष्टदशभुजा महालक्ष्मी समजले जाते. देवीने डाव्या बाजूचा एक हात कानावर टेकविलेला आहे. याचा अर्थ देवी कोणत्यातरी विचारात मग्न आहे असे वाटते. देवीची मूर्ती पूर्वाभिमुखी आसून सकाळी ती बाला, दुपारी तरुणी, सुर्यास्तकाळी वृद्धारुप स्वरुपात भासते. देवीने महिषासुराचा वध केल्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असे म्हणतात. प्रतिदिनी देवीवर अभिषेक केल्यानंतर तिला नखशिखान्त शेंदूर फासण्यात येतो. पापण्या व भुवया रंगाने कोरुन कपाळावर ठसठशीत कुंकू लावण्यात येते. हे कुंकू दरदिवशी निराळ्या रंगाचे असते. त्यानंतर तिला वस्त्रालंकारानी सजविण्यात येते. देवीला रोज महानेवैद्य असतो. या मंदिरातील एक नंदादिप सतत तेवत असतो. या मंदिरात दररोज त्रिकाल आरती होते.
मंदिरातील काही महत्त्वाचे उत्सव

श्री यमाई देवी - औंध
आदिशक्तीची अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. सातारा जिल्ह्यातील औंध येथील मूळपीठ निवासिनी श्रीयमाई हे असेच एक स्वयंभू व प्रमुख शक्तिपीठ आहे. चंडिका, दुर्गा, कालिका, महाकाली, चामुंडी अशी जगदंबेची विविध रूपे आहेत. औंधमध्येही आदिशक्तीची अनेक रूपे पाहावयास मिळतात. औंधासुरासारख्या बलाढ्य राक्षसाला ठार मारणारी मयूरवाहिनी 'मोरळाई', जोतिबाने दिलेल्या 'ये माई' हाकेने 'यमाई' नाव धारण करणारी जगदंबा, युद्धात झालेल्या जखमांचा दाह कमी करण्यासाठी तळ्यात मोकळे केस सोडून स्नान करणारी 'मुक्त केशनी मोकळाई', तर औंधासुराला वर देऊन त्याला आपल्यापुढे स्थान देणारी 'रेणुकामाता', रामाची परीक्षा घेणारी 'तुकाई' आणि मूळपीठ गडावर स्वयंभू स्वरूपात वास करणारी मूळपीठवासिनी 'यमाई' अशी जगन्मातेची विविध रूपे औंधमध्ये पाहावयास मिळतात.
राज्यातील व राज्याबाहेरील लाखो भाविकांची कुलदेवता व श्रद्धास्थान असलेली औंध (ता. खटाव) येथील मूळपीठगडावरील मूळपीठ निवासिनी श्री यमाई देवी हे निसर्गाचे वरदान लाभलेले तीर्थक्षेत्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी यमाई देवीची मंदिरे आहेत; परंतु मूळ किंवा मुख्य ठिकाण औंध येथील मूळपीठ गडावर आहे. सातारा जिल्ह्यात साताऱ्यापासून ४२ किलोमीटर अंतरावर औंध गावाच्या दक्षिणेला असलेल्या मूळपीठ गडावर श्रीयमाई देवीचे मंदिर आहे.
या देवीसंदर्भात अनेक आख्यायिका आहेत. करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या खडतर तपश्चर्येने दुष्टांचा नि:पात करण्यासाठी बद्रिकेदारहून श्रीकेदारनाथांचे (जोतिबा) दक्षिणेकडे आगमन झाले. इकडे येत असताना मणी व मल्ल हे दोन असुर धुमाकूळ घालीत आहेत व अवंदासुर (औंधासुर) जनतेवर अत्याचार करीत आहे, अशी वार्ता त्यांना समजली. मणी व मल्लाचा वध करण्यासाठी मार्तंड भैरव अवतार घेतला व रवळनाथ (जोतिबा) औंधासुराला जिंकायला औंधला आले. दोघांचे महाभयंकर युद्ध झाले. औंधासुर अतिशय पराक्रमी असल्याने तसूभरही हटेना, हे पाहून जोतिबाने श्रीयमाईचा धावा केला. त्याबरोबर यमाई त्याच्या मदतीस आली. तिला पाहताच औंधासुर म्हणाला, ''बाईबरोबर आजपर्यंत कोणी युद्ध केलेले नाही.केले तर त्रिभुवनात अपकीर्ती होईल. तेव्हा तू परतून जा.'' हे ऐकताच यमाईने एकदम अक्राळविक्राळ रूप धारण केले व औंधासुराचा वध केला. तेव्हापासून यमाईचे वास्तव्य येथेच झाले.त्या वेळी औंधच्या परिसरातील जनतेने आनंदोत्सव साजरा केला. तेव्हापासून प्रतिवर्षी असा आनंदोत्सव पौष पौर्णिमेला लोक साजरा करू लागले.
औंध गावाच्या दक्षिणेला असलेल्या मूळपीठ गडावर या देवीचे अतिशय प्राचीन हेमाडपंती मंदिर असून, गाभाऱ्याचे मूळ बांधकाम चालुक्य राजाच्या काळातील म्हणजे इसवी सनाच्या सातव्या शतकातील असल्याचे दिसून येते. त्यानंतर १७४५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला व त्यानंतर १८६९ मध्ये श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधी यांनी मंदिराच्या तटाचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आहे. त्यानंतर १९९४ ते ९६ या कालावधीत यमाई देवस्थानचे तत्कालीन प्रमुख विश्वस्त औंधचे राजेसाहेब (कै.) श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी या मंदिराचा शिखर जीर्णोद्धार केला. त्यानंतर मंदिराच्या परिसरातील दुरुस्ती, रंगरंगोटी व विद्युतरोषणाई आदी कामे औंधचे राजेसाहेब (कै.) भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या कारकिर्दीत झाली व ऑक्टोबर २००० मध्ये औंधच्या राणीसाहेब गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या शिखरावर कलशारोहण करण्यात आले.
या मंदिरामध्ये श्रीयमाई देवीची काळ्या पाषाणातील सुमारे साडेसहा फूट उंचीची कमळात बसवलेली प्रसन्न मूर्ती आहे. औंध संस्थांनचे तत्कालीन अधिपती (कै.) भवानराव श्रीनिवासराव ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी गडावर जाण्यासाठी शहाबादी फरशीच्या ४३२ पायऱ्या बांधून घेतल्या. पायऱ्यांच्या प्रारंभी श्री यमाईदेवीच्या पादुका आहेत.त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या सुरवातीला दोन्ही बाजूंना असलेले सफेद संगमरवरी गजराज भाविकांचे स्वागत करतात. पुढे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना वाघ व सिंह यांचे संगमरवरी पुतळे आहेत. या टप्प्यावर उजव्या बाजूला डोंगरात गणपतीचे छोटे मंदिर आहे. पहिल्या टप्प्याच्या शेवटी जय व विजय या भगवान विष्णूच्या द्वारपालांच्या सफेद संगमरवरातील सहा फूट उंचीच्या भव्य मूर्ती आहेत. त्यानंतर या डोंगरावर पठार असून, या सपाट भागावर उजव्या बाजूला श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केलेले प्रख्यात भवानी संग्रहालय आहे.
दुसऱ्या टप्प्यावर नारद व तुंबर यांच्या मूर्ती असून, तिसऱ्या टप्प्यावर उजव्या बाजूला मारुती व शंकराची छोटी मंदिरे आहेत. या टप्प्यावर शेवटी गरुड व हनुमान यांच्या सहा फूट उंचीच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्यानंतर बालेकिल्ला असून, या बालेकिल्ल्याला प्रचंड बुरुजांची भक्कम तटबंदी आहे. आत श्री यमाई देवीचे मंदिर आहे. पूर्वेला असलेल्या नंदीच्या मागील बाजूस तटाला एक खिडकी असून, सूर्योदयाच्या वेळी या खिडकीतून येणारे सूर्यकिरण यमाई देवीच्या मुखावर पडतात. मुखदर्शनाची ही पर्वणी मानली जाते. या खिडकीला असलेले फिरते खांब हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे फिरते खांब येथील विशेष आकर्षण आहे. पुढे तटामध्ये ओवरी असून, या ओवरीच्या भिंतीत म्हणजे तटातील कोनाड्यात गणपती, दत्त, विष्णू, लक्ष्मी, मारुती व सरस्वती यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. पुढे प्रदक्षिणेच्या मार्गावर दत्त मंदिर आहे.
औंध गावातही या देवीचे अतिशय भव्य व आकर्षक असे मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडप अतिशय भव्य आहे. या सभामंडपात श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी स्वतः काढलेली रामायण, महाभारत, देवीसप्तशती, शिवचरित्रामधील भव्य व आकर्षक अशी तैलचित्रे आहेत. या मंदिरासमोर राज्यातील सर्वांत उंच दीपमाळ असून, त्यावरील शिल्पकाम आकर्षक आहे. या मंदिराजवळ राजवाडा असून, या राजवाड्यात क-हाडदेवीचे मंदिर आहे. या मंदिरात भवानी सहस्रनामातील देवीची विविध रूपे दर्शविणारी बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी स्वतः काढलेली अनेक तैलचित्रे आहेत.
येथे चैत्र महिन्यात 'वासंतिक उत्सव', आश्विन महिन्यात 'नवरात्रोत्सव' व पौष महिन्यात 'वार्षिक यात्रा' असे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात.
श्रीएकवीरा देवी - कार्ला
मुंबई-पुणे मार्गावर लोणावळ्यापासून ११ किमी अंतरावर कार्ल्याच्या डोंगरावर एकवीरा देवीचे स्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी पाय-यांनी डोंगर चढून जावे लागते. पण डोंगर चढताना दिसणारा इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर , लोहगड , तुंग असे गडकिल्ले हा सारा परिसर मन मोहून घेतो. हिवाळ्यात वा पावसाळ्यात हिरवाकंच असलेला हा परिसर अगदी वेडावून टाकतो.
श्रीपरशुरामाची माता रेणुका हीच एकवीरा या नावाने ओळखली जाते. भारतात रेणुकेची जी जी स्थाने आहेत ती सर्व एकवीरा देवीचीच स्थाने म्हणून ओळखली जातात. विशेषकरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत श्रीएकवीरा देवीची पूजा मोठय़ा प्रमाणात केली जाते. परशुराम हा त्याच्या काळात एकमेव वीर होता. त्यावरून त्याच्या आईला हे नाव मिळाले असावे. श्रीएकवीरा ही संत एकनाथांची कुलदेवता होती. एकनाथी भागवताच्या मंगलाचरणात संत एकनाथांनी श्रीएकवीरा देवीचे वर्णन केले आहे.
‘‘ते शिवशक्तिरूपें दोनी। नेऊन मिरवे एकपणीं।
एकपणे आली गुर्विणी। प्रसवे एकपणीं एकवीरा।।
ते एकरूपें एकवीरा। प्रसवली बोध-फरशधरा।
जयाचा कां दरारा। महावीरां अभिमानियां।।
तेणें
उपजोनि निवटिली माया। आज्ञा पाळुनि सुख दे पितया।
म्हणोनि तो जाहला विजया।
लवलाह्य़ां दिग्मंडळीं।।
जो वासनासहस्रबाहो। छेदिला सहस्रार्जुन-अहंभावो।
स्वराज्य करुनियां पाहा हो। अर्पी स्वयमेवो स्वजातियां।।
कथा
अदितीने तपश्चर्या
केल्यावर भगवान शंकरांनी तिला वर दिला की, तुझा अवतार भूतलावर
रेणुराजाच्या घरी होईल. त्या वेळी तुझे मूळ नाव रेणुका असे असेल; परंतु
भूतलावर मात्र तू एकवीरा या नावाने प्रसिद्ध होशील, तसेच तुला पाच पुत्र
होतील.’’यावरून असे दिसते की, एकवीरा हे नाव भगवान शंकरांनीच दिले होते.
दुसरी
व्युत्पत्ती अशी सांगता येईल की, द्रविडियन लोकांची रेणुका ही लोकप्रिय
देवता असून तिचे नाव ‘अक्का अव्वैचार’ असे आहे. त्याचा अर्थ पूजनीय माता!
या द्रविडियन नावापासून ‘एकवीरा’ हा शब्द तयार झाला असावा.
एकवीरा देवीची एक अख्यायिका अशी की , आदितीने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने तिला वर दिला की इश्वाकू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल. तुला होणा-या पाच पुत्रांत एक पुत्र महावीर असेल. त्याच्या पराक्रमामुळे तू एकवीरा म्हणून ओळखली जाशील.
कार्ला येथील
शिल्पे उशवदत्त शकाधिपती राजाने सन १२० साली बांधले असा उल्लेख सापडतो.
मंदिराचा जीर्णोद्धार १८६६ साली झाला असल्याचा संदर्भ सापडतो. मंदिरातील
घंटाही अतिप्रश्नचीन आहे. कार्ला येथील श्रीएकवीरा देवीची पालखी उत्सवाच्या
वेळी निघते ती अतिशय प्रेक्षणीय असते. नवरात्रौत्सवात येथे देवी
उपासकांचा महासागर पाहायला मिळतो. दुर्गा म्हणजे पार्वती! श्रीमहालक्ष्मी,
श्रीमहासरस्वती आणि श्रीमहाकाली ही पार्वतीचीच तीन रूपे! दुष्टांना ठार
मारणे आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठीच देवीने हे अवतार घेतले आहेत.
एकवीरा देवीचे हे स्थान स्वयंभू आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे. सीकेपी किंवा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचीही ही देवता असल्याचे मानतात. एकवीरा देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी आई म्हणून ती ओळखली जाते. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याआधी एकवीरा आईचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. लग्न असो वा मंगल कार्य , कोळी बांधव सर्वात आधी एकवीरा आईला आमंत्रण देतात. अगदी मासेमारीचा मोसम सुरु होण्याआधी एकवीरा आईची आराधना केली जाते. एकवीरा आई प्रसन्न झाली की , तिचा नवस फेडण्यासाठी कोंबडा कापण्याची प्रथा आजही कोळी समाजात आहे.
एकोणिसाव्या
शतकाच्या उत्तरार्धात विष्णुदास नावाचे एक थोर पुरुष एकवीरा देवीचे मोठे
उपासक होऊन गेले. त्यांचा मठ माहूर येथे आहे. कार्ला येथील एकवीरा देवीचे
मंदिर हे मूळचे एका खडकात खोदून काढलेले असावे. त्यानंतर केव्हा तरी ते
बांधले गेले असावे. देवीची मूर्ती डोंगराच्या एका खडकातच कोरलेली आहे.
कार्ला येथील श्रीएकवीरा देवी कोळी आणि प्रभुलोकांची कुलदेवता आहे असे
उल्लेख आढळतात. चैत्र शुक्ल अष्टमीला येथे मोठी यात्रा असते. गुहागार व
किन्हई येथेही एकवीरा देवीची मंदिरे आहेत.
सह्याद्रीच्या डोंगरद-यात शिवरायांच्या स्फूर्तीदायक इतिहासाच्या पाऊलखुणा जशा अद्याप कायम आहेत त्याचप्रमाणे बौद्धकालीन युगाच्या खुणाही अनेक लेण्यांमध्ये विसावल्या आहेत. श्री एकवीरा देवीच्या मंदिराशेजारीच जगप्रसिद्ध कार्ला लेणीही आहेत. बौध्द भिख्खूंनी बांधलेली ही पुरातन लेणी वास्तुकलेचा अजरामर इतिहास जोपासत आहे. ख्रिस्तपूर्व दुस-या शतकात ती बांधलेली असावीत , असा अंदाज आहे.
जोगवा
संत एकनाथ महाराज विरचित आईचा जोगवा
अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषा सुरमर्दाना लागोनी
त्रिविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागोनी पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारोनी माळ मी घालीन
हाती बोधाचा झेंडा मी धरीन
भेदरहित वारिसी जाईल
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन
नवविधा भक्तीच्या करोनी नवरात्रा
करोनि निराकारण पोटी मागेन ज्ञानपुत्रा
दंभसासरा मांडीन कुपात्रा
करीन आंतरी सद्भावे मुद्रा
आईचा जोगवा जोगवा मागेन
पुर्ण बोधाची भरीन मी परडी
आशा मनशांच्या पाडीन दरडी
मन विकार करीन कुरवंडी
अमृत रसाची भरीन मी दुरडी
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन
आता साजनी झाले मी निसंग
विकल्प नवऱ्याचा सोडियला संग
काम क्रोध हे झोडियेले मांग
केला मोकळा मार्ग सुरंग
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन
ऐसा जोगवा मागोनी ठेवीला
जाउनी महाद्वारी नवस मी फेडिला
एका जनार्दनी एकपणे देखिला
जन्ममरणाचा फेरा मी चुकविला
आईचा जोगवा जोगवा मागेन
सदानंदाचा यळकोट